अमरावती

अखेर अमरावतीत अखिल भारतीय वकिली पात्रता परीक्षा केंद्र मंजूर

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; अमरावती विभागातील विधी पदवीधरांना मोठा दिलासा

अमरावती प्रतिनिधी 

अमरावती येथे अखिल भारतीय वकिली पात्रता परीक्षा (एआयबीई) केंद्र मंजूर झाल्याने अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील विधी पदवीधर व नवोदित वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही काळापासून या केंद्रासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले.
वकिली व्यवसायासाठी आवश्यक असलेली अखिल भारतीय वकिली पात्रता परीक्षा बार कौन्सिल ऑफ इंडिया मार्फत घेतली जाते. विधी पदवी पूर्ण करून राज्य बार कौन्सिलमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून, वकिली व्यवसायाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ती आवश्यक असते.
यापूर्वी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथेच परीक्षा केंद्रे उपलब्ध होती. अमरावती विभागात केंद्र नसल्यामुळे येथील उमेदवारांना दूरच्या शहरांमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे प्रवास, निवास, भोजन आणि इतर खर्चाचा अतिरिक्त आर्थिक भार उमेदवारांवर पडत होता. तसेच वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी होणारी धावपळ, प्रवासाचे नियोजन आणि मानसिक ताण यालाही सामोरे जावे लागत होते.
अमरावती येथे परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्याने या सर्व अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. विशेषतः अमरावती विभागातील सहा जिल्ह्यांतील उमेदवारांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून परीक्षेसाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही.

तिघांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

अमरावती येथे परीक्षा केंद्र मिळावे यासाठी अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. प्रशांत (बबलू) देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नात जिल्हा वकील संघाचे सचिव अँड. गिरीश धर्माळे, उपाध्यक्ष अँड. भोयर, अँड. वरूडकर, ग्रंथालय सचिव अँड. शर्मा तसेच संपूर्ण कार्यकारिणीचे मोलाचे सहकार्य लाभले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य अँड. आशिष देशमुख यांनीही बार कौन्सिलच्या पातळीवर ही मागणी प्रभावीपणे मांडली. तसेच अँड. वैभव अनिलराव ठाकरे यांनी अमरावती येथे केंद्राची आवश्यकता आणि उमेदवारांची गैरसोय याकडे दिल्लीपर्यंत संबंधितांचे लक्ष वेधत सातत्याने पाठपुरावा केला.
या तिघांच्या तळमळीच्या आणि सामूहिक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून अमरावती येथे अखिल भारतीय वकिली पात्रता परीक्षा केंद्र मंजूर झाले आहे. यामुळे संपूर्ण अमरावती विभागातील विधी पदवीधर आणि नवोदित वकिलांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि अभिमानास्पद बाब ठरली आहे.

अमरावती येथे AIBE परीक्षा केंद्र मंजूर होणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. वकिलीच्या क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर AIBE परीक्षा हा प्रत्येक नवोदित वकिलासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र, सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असूनही अमरावतीसारखे महत्त्वाचे आणि मध्यवर्ती शहर आजपर्यंत या परीक्षा केंद्रापासून वंचित होते. हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि त्यानंतर मी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. निवेदने दिली, पत्रव्यवहार केला, माहितीच्या अधिकाराचा वापर केला आणि दिल्लीपर्यंत हा विषय पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या प्रवासात अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले आणि अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले. या मागणीची दखल घेऊन पाठपुरावा करणारे मा. खासदार डॉ. अनिलजी बोंडे, माजी केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान, Bar Council of India चे सदस्य मा. अ‍ॅड. आशिष देशमुख सर, अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. प्रशांत देशमुख सर तसेच मा. अ‍ॅड. शिरीष जाखड सर यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळे या मागणीला निश्चितच बळ मिळाले. अमरावती AIBE परीक्षा केंद्राचा फायदा केवळ अमरावती जिल्ह्यालाच नव्हे, तर अकोला, यवतमाळ, वाशीम, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांतील कायद्याच्या विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात होणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ, वाहतूक खर्च आणि परीक्षेसाठी दूरच्या शहरात जाण्याचा मानसिक त्रास कमी होईल. माझ्यासाठी हा केवळ एका मागणीचा विजय नाही, तर सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य पाठपुरावा आणि सामूहिक सहकार्य यांचे फलित आहे. हा आनंद आणि हा विजय संपूर्ण विदर्भातील कायद्याच्या विद्यार्थ्यांचा, नवोदित वकिलांचा आणि या प्रयत्नात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा आहे – अँड. वैभव अनिलराव ठाकरे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!