दि. १६, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या (आरटीओ) अमरावती विभागीय अध्यक्षपदी अनिल मानकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, खामगाव, बुलढाणा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांतील कर्मचारी प्रतिनिधींनी एकमताने विश्वास व्यक्त करीत त्यांच्यावर पुन्हा विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रशासकीय व सेवाविषयक प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून मानकर यांची ओळख आहे. संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या शासन व प्रशासनाच्या स्तरावर प्रभावीपणे मांडण्यात त्यांनी यापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, संघटनेची भूमिका स्पष्टपणे मांडणे आणि कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी ठाम भूमिका घेणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळेच सहा जिल्ह्यांतील कर्मचारी प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला.
फेरनिवडीनंतर मानकर यांनी सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. हे पद केवळ सन्मानाचे नसून मोठ्या जबाबदारीचे असल्याचे सांगून विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या न्याय्य प्रश्नासाठी संघटितपणे पाठपुरावा करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, फेरनिवडीबद्दल विभागातील अधिकारी-कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी व सहकाऱ्यांनी मानकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
Add Comment