अमरावती

पाण्याखाली तिरंगा ध्वजासह सायकल चालवत पोलीस हेड कॉन्स्टेबलची विक्रमी कामगिरी

अमरावती : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अमरावती शहर पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण दादाराव आखरे यांनी पाण्याखाली तिरंगा ध्वजासह सायकल चालवत अनोखी विक्रमी कामगिरी केली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जलतरण केंद्र, अमरावती येथे त्यांनी हे धाडसी प्रात्यक्षिक सादर केले.

 

१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण आखरे यांनी कोणत्याही कृत्रिम प्राणवायूचा वापर न करता स्वतःच्या श्वासावर नियंत्रण ठेवत एक मिनिट १६ सेकंद पाण्याखाली राहून तिरंगा ध्वजासह २५ मीटर सायकल चालविली. त्यांच्या या अनोख्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
या कामगिरीसाठी आखरे यांनी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सराव केला. पाण्याखाली सायकल चालवितानाही त्यांनी हेल्मेटच्या वापराचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देतानाच नवीन पिढीला राष्ट्रप्रेम, धैर्य, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.
पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण आखरे यांच्या या धाडसी आणि कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे अमरावती शहर पोलीस दलाची मान आणि प्रतिमा उंचावली असून, त्यांच्या विक्रमी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!