२६ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत होणार गौरव
अमरावती : प्रतिनिधी
आग लागलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःला झोकून देत सिलिंडर बाहेर काढून जय अंबा अपार्टमेंटच्या ७० कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करिना थापाच्या धाडसी वृत्तीची दखल घेऊन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड केली आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एका शानदार समारंभात तिला या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावरसिंह आणि साहिबजादा फतेहसिंह यांनी देशासाठी दिलेल्या प्राणांच्या आहुतीचे स्मरण म्हणून २६ डिसेंबर रोजी देशात ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जातो. याच औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान- तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि संशोधन क्षेत्रामध्ये कतृत्वाची छाप सोडणाऱ्या भारतातील मुला-मुलींची विविध निकषांच्या आधारे निवड केली जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
धुरांचे लोट, गरम टाइल्स आणि श्वास गुदमरवणाऱ्या स्थितीचा यशस्वी सामना करून आपले अपार्टमेंट आगीपासून वाचविण्याच्या ध्येयाने धाडसाचा परिचय देणाऱ्या करिना थापाचे (वय १७) राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. समयसूचकता व धाडसाच्या जोरावर तिने सिलिंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला व भीषण अपघातातून अपार्टमेंटचे रक्षण केले. या सर्व घटनाक्रमात धाडस व समयसूचकतेचा परिचय देणाऱ्या करिनाच्या या अनन्यसाधारण कार्याची दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास विभागाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. सर्व निकषांती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड झाली.
कठोरा परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शेजारील जय अंबा अपार्टमेंटमध्ये १५ मे २०२४ च्या सायंकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली. अपार्टमेंटच्या ”बी-विंग” मधील दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमधून धूर निघत असल्याचे दिसताच घरकाम करणाऱ्या करिना थापाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, आग आणि धुराचे लोट येत असतानाही पाण्याच्या बादल्यांचा सतत मारा करत तिने सिलिंडर शेजारील आग पूर्णपणे आटोक्यात आणत सिलिंडर बाहेर काढले. अशात सिलिंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असता. करीनाच्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व अपार्टमेंटचे रक्षण झाले.
Add Comment